
“२०२२ मध्ये मी नवखा होतो. पण आता २०२३ मध्ये एमआयमुळे मी परिपक्व झालोय”: तिलक वर्मा
तिन्ही क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळेच हा विजय शक्य झाला आणि आपला हैदराबादी छोकरा असलेला तिलक वर्मा एमआयच्या १४ धावांनी विजयात एक महत्त्वाची कामगिरी करणारा खेळाडू ठरला. या २० वर्षीय खेळाडूने २१७.६५ अशा स्ट्राइक रेटने खेळताना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर आपली बॅट घुमवली आणि स्टँड्समध्ये चार षटकार रोंरावत गेले. एसआरएच विरूद्ध एमआय सामन्यात विजयी कामगिरी करून आलेल्या तिलक वर्माने सामन्यानंतरच्या अधिकृत पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याने सर्वप्रथम आपल्याला कोणत्या स्थानावर फलंदाजी करायला आवडेल हे सांगितले.
“मला कोणत्याही स्थानावर खेळायला आवडते. मी सर्व संभाव्य परिस्थितींचा विचार करून मैदानावरील माझ्या खेळावर मेहनत केली आहे. मी व्यवस्थापनाला कायम सांगतो की मला कोणत्याही स्थानावर आणि कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही विश्वास वाटतो आणि ते मला फलंदाजी करायला पाठवतात,” तो म्हणाला.
“माझ्या मते विकेट हलकी होती आणि स्पिनर्ससाठी चेंडू वळवण्याची संधीही तिथे होती. त्यामुळे मी त्या परिस्थितीचा आणि टीमला काय आवश्यक आहे याचा विचार करत होतो.
“मला स्पिनर्सचा सामना करणे टाळून जलदगती गोलंदाजांच्या चेंडूवर खेळण्याची मी प्रतीक्षा करत होतो. वॉशी (वॉशिंग्टन सुंदर) आणि मयू (मयंक मार्कंडे) चांगली गोलंदाजी करत होते. जलदगती गोलंदाजांवर हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या गोलंदाजीवर खेळण्याबाबत मी विचार केला. मला ओव्हर चुकवायची नव्हती कारण आमच्याकडे खूप फलंदाज आहेत. त्यामुळे मी सरळ हल्ला चढवला आणि मला जसे खेळायचे होते तसे खेळलो. त्यामुळे मी खूप आनंदात आहे.”
मागच्या सीझनमधला आणि या सीझनमधला म्हणजे त्याचा पहिला सीझन आणि आत्ताचा सीझन फरक यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर तिलक वर्माने अत्यंत परिपक्व खेळाडूसारखे उत्तर दिले. “पहिल्या सीझनमध्ये (२०२२) मध्ये मी एक तरूण खेळाडू होतो. पण तेव्हापासून मला टीमने कायमच पाठिंबा दिला आहे. ते मला तरूण किंवा टीममध्ये नवीन आलेला खेळाडू म्हणून पाहत नाहीत. ते मला खेळाडू म्हणून परिपक्व होण्यासाठी मदत करतात. त्याममुळे माझ्यासाठी मागच्या वर्षाच्या तुलनेत इथे जुळवून घेणे खूप सोपे गेले.”
“आमचा संघ (मुंबई इंडियन्स) मला अशा प्रकारे सांभाळतात की त्यामुळे मी आयपीएल किंवा इतर कोणतीही स्पर्धा पहिल्यांदाच खेळतोय असे मला वाटत नाही. क्रिकेटचा देव (सचिन तेंडुलकर), भारतीय कर्णधार (रोहित शर्मा) यांच्यासोबत आणि इतर सर्व खेळाडू सोबत असल्यामुळे मला त्यांच्यासोबत आत्मविश्वास वाटतो आणि खेळणे सहजही वाटते.”
आणि संवाद संपवताना त्याने कसलेल्या खेळाडूप्रमाणे त्याला त्याच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबाबत सांगितले. “सचिन सर मला म्हणाले की तुझा दृष्टीकोन स्पष्ट ठेव, मग धावा कर किंवा नको करूस. रोहित सर म्हणाले की, तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेव आणि जे काही करतो आहेस त्यात तुझे १०० टक्के योगदान दे. मग बाकी सगळे नीट होईल.”