
MI vs DC: मुंबई इंडियन्सकडून डीसीचा पराभव, प्लेऑफ्समध्ये थेट धडक
आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात आपल्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
आयपीएल गुणतकक्त्यात एमआय आता १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआयने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन १८० धावा केल्या. पाठलाग करताना डीसीला १८.२ ओव्हर्समध्ये फक्त १२१ धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा तिसऱ्या षटकात फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर सलामीवीर रायन रिकेलटनने विल जॅक्ससह डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण विल जास्त काळ विकेटवर राहू शकला नाही. त्याने १३ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावा केल्या.
सातव्या ओव्हरमध्ये आपल्या संघाला रायनच्या रूपात तिसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूत २५ धावा केल्या. त्यात दोन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्मासोबत खेळाची सूत्रे हाती घेतली आणि आपल्याला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली.
तिलक वर्माने २७ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर कर्णधार हार्दिक पांड्याला फक्त तीन धावा करता आल्या.
नाबाद अर्धशतकी खेळी खेळत सूर्यकुमारने ४३ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. नमन धीरनेही शानदार फलंदाजी केली आणि ८ चेंडूत सलग २४ धावांचे योगदान दिले.
नमनने त्याच्या डावात दोन चौकार आणि दोन षटकारही मारले. अशा रितीने मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये पाच गडी गमावून दिल्लीला १८१ धावांचे लक्ष्य दिले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस मुंबईच्या गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकू शकले नाहीत.
ट्रेंट बोल्टने राहुलला (११) आणि दीपक चहरने फाफला (६) बाद केले.
यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने अभिषेकला बाद केले. त्याला फक्त सहा धावा करता आल्या.
विप्राज निगमने ११ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या. दहाव्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सला जसप्रीत बुमराहने दोन धावांवर बाद केले.
यानंतर दिल्लीने समीर रिझवीची विकेट गमावली. तो दुसऱ्या टोकाकडून शानदार फलंदाजी करून सर्वाधिक धावांचे योगदान देत होता.
समीरने ३५ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावांची चांगली खेळी केली. मग डीसीने एकामागोमाग एका विकेट गमावल्या.
आशुतोष शर्माने १८, माधव तिवारीने ३, दुष्मंथ चामीरा ८ आणि कुलदीप यादवने ७ धावा केल्या. दिल्लीचा संघ १८.२ षटकांत १२१ धावा करून सर्वबाद झाला.
मुंबईकडून मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर दीपक चहर, विल जॅक्स, कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मिचेल सँटनरने हंगामातील ३/११ (४) अशी किफायतशीर गोलंदाजी केली.
एमआयच्या टीमने ११ व्या आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना सोमवार दिनांक २६ मे रोजी पंजाब किंग्सविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या:
मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव.
मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये १८०/५; सूर्यकुमार यादव ७३ (४३), मुकेश कुमार २/४८
दिल्ली कॅपिटल्स : १८.२ ओव्हर्समध्ये १२१/१०; समीर रिझवी ३९ (३५), मिशेल सँटनर ३/११