आयपीएल २०२७ लिलाव: पुढचा थांबा, गोवा! लिलावाच्या मोठ्या दिवसापूर्वी जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

आयपीएल २०२७ लिलाव: पुढचा थांबा, गोवा! लिलावाच्या मोठ्या दिवसापूर्वी जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

By Mumbai Indians

पलटन, कॅलेंडरमध्ये तारीख नोंदवून ठेवा! लिलावाची उलटगणती सुरू झाली आहे. बोली लावण्यासाठी फ्रँचायझी सज्ज असून, खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चुरस रंगणार आहे. आयपीएलचा लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असून, हा लिलाव रंगतदार ठरणार आहे. प्रत्येक बोली सामन्याचं गणित बदलू शकते. विजेतेपद पटकावण्याची क्षमता असलेला संघ उभारण्यावर प्रत्येक फ्रँचायझीचं लक्ष असेल. मुंबई इंडियन्सचा भर सध्याचा संघ अधिक सक्षम करण्यावर, संघातील महत्त्वाच्या उणिवा भरून काढण्यावर आणि आधीच प्रतिभावान खेळाडूंनी सजलेल्या संघात निर्णायक फरक घडवू शकणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यावर असेल. नियोजन, प्रतिभावान खेळाडूंचा शोध आणि आखलेल्या रणनीतीला प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ लिलावाच्या दिवशी येणार आहे.

आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्सने कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे, हे अद्याप पाहिलं नसेल तर इथे वाचा!

५५ परदेशी खेळाडूंसह एकूण १८४ खेळाडूंना संघांनी कायम ठेवलं आहे. दहा संघांमध्ये मिळून एकूण ६६ जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता लिलावाच्या चर्चांना उधाण येण्याची वेळ आली आहे!

मुंबई इंडियन्सच्या निळ्या-सोनेरी ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येक खेळाडूची भूमिका महत्त्वाची असेल. आगामी हंगामात आपल्या चाहत्यांना जल्लोषाच्या अनेक संधी देणारा संघ उभारणं, हेच अंतिम ध्येय आहे. योग्य वेळी योग्य खेळाडूला संघात घेणं, हीच लिलावातील खरी कसोटी असते. एखाद्या खेळाडूची चतुराईने केलेली निवड, अनपेक्षित बोली किंवा एखाद्या खेळाडूसाठी फ्रँचायझींमध्ये रंगणारी चुरस... अनेक रंजक वळणांनी हा लिलाव रंगणार आहे.

चला, आता आकडेवारीवर एक नजर टाकूया. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सची स्थिती नेमकी कशी आहे, ते जाणून घेऊया!

मुंबई इंडियन्सकडे लिलावासाठी शिल्लक रक्कम ३२.६ कोटी रुपये
संघातील सध्याची खेळाडूंची संख्या १६
संघातील रिक्त जागा ९
परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध जागा २

निळ्या-सोनेरी ताफ्याला आणखी बळकटी देण्याची आणि आणखी एका अविस्मरणीय हंगामाच्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. पलटन, आपल्या आयपीएल प्रवासातील नव्या अध्यायाला आता आकार मिळणार आहे. लिलावाच्या या मोठ्या दिवसासाठी गोवा सज्ज आहे, तुम्ही आहात ना?