मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्ड यांची नियुक्ती
मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्ड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे क्रिकेटमधील खेळाडू ते प्रशिक्षक असा दीर्घकाळ चालत आलेला त्यांचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास आता एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता एम. अंबानी म्हणाल्या,
“पोलार्ड अवघ्या २२ वर्षांचा असताना मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. गेल्या सोळा वर्षांत तो आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे. एक खेळाडू म्हणून त्याने आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आणि प्रशिक्षक म्हणूनही तो आपला अनुभव, खेळाविषयीची आवड आणि क्रिकेटची सखोल जाण संघातील खेळाडूंसोबत सातत्याने शेअर करत आला आहे. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून तो ही नवी जबाबदारी स्वीकारत असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. MI ची जर्सी घालण्याचा अर्थ काय आणि पलटनसाठी खेळताना काय अपेक्षित असतं, याची पॉलीला उत्तम जाण आहे. या नव्या भूमिकेतही तो तितक्याच निष्ठेने, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने काम करेल, याची मला खात्री आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असताना मी त्याला मनापासून शुभेच्छा देते.”
मुंबई इंडियन्स, संघाची संस्कृती आणि सर्वोच्च स्तरावर खेळताना येणारी आव्हानं यांची पोलार्डला उत्तम जाण आहे. टी२० क्रिकेटमध्ये काळानुसार होत गेलेले बदल त्याने जवळून अनुभवले आहेत. त्यामुळे खेळाचं बदलतं स्वरूप, रणनीतीच्या वाढत्या गरजा आणि दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली स्पर्धा याबाबतचा त्याचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरणार आहे. मुंबई इंडियन्ससोबत आधी खेळाडू म्हणून आणि अलीकडच्या काळात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केल्यामुळे संघाच्या यशामागील महत्त्वाच्या गोष्टींची त्याला सखोल समज आहे. हाच अनुभव मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी भक्कम पाया ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्ड म्हणाले,
“मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. MI हा माझ्या आयुष्याचा आणि क्रिकेट कारकिर्दीचा अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. या संघाशी, खेळाडूंशी आणि पलटनशी माझं असलेलं नातं माझ्यासाठी खूप खास आहे. आधी खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून हा प्रवास अनुभवल्यामुळे मुंबई इंडियन्सची ओळख नेमकी कशात आहे आणि निळ्या-सोनेरी रंगांचं प्रतिनिधित्व करताना किती मोठी जबाबदारी असते, याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी नीता अंबानी, आकाश अंबानी आणि संपूर्ण MI परिवाराचा मनापासून आभारी आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत जवळून काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. संघाचा समृद्ध वारसा पुढे नेणं, नव्या प्रतिभेला घडवणं आणि पलटनला आनंद साजरा करण्याच्या आणखी अनेक संधी मिळवून देणं, हेच माझं ध्येय असेल.”
पोलार्डची नियुक्ती ही संघाचा यशस्वी वारसा पुढे नेताना नव्या प्रतिभेला वाव देणं, संघाची संस्कृती अधिक मजबूत करणं आणि मैदानावर तसेच मैदानाबाहेर सर्वोत्तम कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं, या मुंबई इंडियन्सच्या बांधिलकीचं प्रतीक आहे. MI च्या सर्वात यशस्वी काळाचा भाग असल्याचा अनुभव पोलार्डच्या नेतृत्वाला भक्कम आधार देईल. त्याचबरोबर संघाचं पुढील पर्व घडवण्याची महत्त्वाकांक्षाही त्याच्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी असेल.