नमन धीरची १७३ (६४) धावांची खेळी: दमदार प्रहार, ताकद आणि निव्वळ काव्य

नमन धीरची १७३ (६४) धावांची खेळी: दमदार प्रहार, ताकद आणि निव्वळ काव्य

By Mumbai Indians

डावाची सुरुवात करताना फलकावर झळकल्या अविस्मरणीय १७३ धावा, 💙

आपल्या नमन धीरने विक्रमी खेळी साकारत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. 👊

मैदानातील मोकळ्या जागा अचूक हेरल्या आणि चेंडू सहज सीमारेषेपार धाडला, 🤌

आपल्या संघाच्या विजयाच्या आशांना नवा विश्वास दिला. 🙏

या प्रतिभावान फलंदाजाला जेव्हा सापडली लय आणि सूर, ♾

तेव्हा प्रतिस्पर्धी गोलंदाजांकडे उरलं नाही कोणतंच उत्तर. 💪

आक्रमणाचा मोड ऑन आणि वेग कमी करण्याचा प्रश्नच नाही... 🔥

सगळीकडे दिसली फक्त ताकद, अफलातून खेळ आणि स्पष्ट निर्धार. 😅

नमनचा मुंबई इंडियन्स DNA पुन्हा एकदा तेजाने झळकला, 💙

बॅट, बॉल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने विजयावर शिक्कामोर्तब केलं! 🧨

नमन धीर... मानलं भाऊ! पलटन, काही खेळी अशा असतात की त्या पाहताना आपण थक्क होतो आणि त्या खेळाडूचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. आपल्या MI स्टार नमन धीरने अगदी हेच करून दाखवलं आणि क्रिकेटविश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आघाडीवरून नेतृत्व करत त्याने शेर-ए-पंजाब टी२० लीगमध्ये अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १७३ धावांची वादळी खेळी केली. १६ चौकार, १२ षटकार आणि २७० चा स्ट्राइक रेट असलेल्या या खेळीने त्याने आय. एस. बिंद्रा पीसीए स्टेडियमला जणू स्वतःचं मैदान बनवलं. त्याने गोलंदाजांना अचूक वाचलं आणि सामन्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहिला. 👏

आपल्या संघासाठी डावाची सुरुवात करताना नमनचा गेम प्लॅन अगदी स्पष्ट होता. सुरुवातीला त्याने परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि मग चौकारांचा ओघ सुरू झाला, षटकार आकाशात झेपावू लागले... काय घडतंय हे समजण्याआधीच धावफलक वेगाने पुढे सरकत होता. त्याने खेळलेल्या पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटपर्यंत त्या क्षणावर त्याचंच वर्चस्व होतं. शतक पूर्ण झाल्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. उलट शक्य तितक्या अधिक धावा करण्यासाठी तो आणखी जोमाने खेळला आणि चाहत्यांना अखेरपर्यंत खिळवून ठेवत त्यांच्याकडून जोरदार जयघोष मिळवला.

चेंडू पाहायचा, त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकावायचा, हाच त्याचा दृष्टिकोन होता. प्रत्येक चेंडू त्याने त्याच्या गुणवत्तेनुसार खेळला. त्याचा इंटेंट आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शानदार होता. त्याचवेळी तो दुसऱ्या टोकावरील साथीदारांचाही आत्मविश्वास सातत्याने वाढवत राहिला. प्लेयर ऑफ द मॅच नमनने जशनप्रीत सिंगसोबत शानदार १२० धावांची भागीदारीही रचली. त्यानंतर बॉलनेही कमाल करत त्याने दोन षटकांत अवघ्या आठ धावा देत दोन विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याच्या संघाने हा सामना ६७ धावांनी जिंकला.

मुंबई इंडियन्ससाठी ही आपल्या ओळखीच्या नमन धीरची आणखी एक खास झलक होती... निर्भीड, ताकदवान आणि प्रत्येक वेळी सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सज्ज. अशी कामगिरी जी पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटते. या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रमही मोडले. त्याची १७३ धावांची खेळी ही टी२० क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. शेर-ए-पंजाब टी२० स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक आणि पहिलेच वैयक्तिक १५०+ धावांचे स्कोअर ठरले. त्याच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला—भारतातील राज्यस्तरीय टी२० लीगमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. 💪🔥

नमन धीरने आणखी एक मोठं पाऊल पुढे टाकत सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून दिली की संधी दार ठोठावते, तेव्हा ती दोन्ही हातांनी पकडायची असते. नमनने फक्त संधीचं दार उघडलं नाही, तर आपल्या वादळी खेळीने त्या दाराची चौकटच उखडून टाकली!