“रो एक अद्भुत खेळाडू आहे... भारताच्या एका महान फलंदाजासोबत मैदानात खेळताना मजा येते”: रिकल्टन

“रो एक अद्भुत खेळाडू आहे... भारताच्या एका महान फलंदाजासोबत मैदानात खेळताना मजा येते”: रिकल्टन

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्ससाठी १०.५ ओव्हर्समध्ये १४३ धावांची सलामीची भागीदारी गेल्या निराशाजनक दोन आठवड्यांतील कामगिरीत बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेला संजीवनी ठरली. वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध २२९ धावांचा विक्रमी पाठलाग रायन रिकेल्टन (३२ चेंडूंत ८३ धावा) आणि पुनरागमन करणारा 'हिटमॅन' रोहित शर्मा (४४ चेंडूंत ८४ धावा) यांच्या प्रयत्नांमुळे सहज पार पडला.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रिकेल्टनने या दोघांच्या भागीदारीतील विशेष घटकाविषयी सांगितले, “रो (रोहित) खूप चांगला खेळतो, मैदानावर आमच्यात तीच केमिस्ट्री आहे.” अर्थातच मैदानावर उतरून खूप आनंद झाला. "तो काही काळ संघाबाहेर होता आणि त्याला परत येऊन ज्या सहजतेने खेळताना पाहिले, ते खूपच अनोखे आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून आम्ही एकमेकांना उत्तम साथ देतो. आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर धावा करतो आणि आम्हाला दबाव कसा टाकायचा आहे, याबद्दल आम्ही खूप स्पष्ट आहोत. वानखेडेवर आम्हाला खूप चांगली खेळपट्टी आणि फलंदाजीसाठी एक छान जागा लाभली आहे. तिथे खेळताना खूप आनंद झाला आणि पुढेही अशीच चांगली कामगिरी करू अशी आशा आहे."

एमआयचा दहा सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे आणि गेल्या चार सामन्यांमधील पहिला. विजयाच्या मार्गावर परत येणे आणि पलटनला आनंदाची संध्याकाळ देणे खूप महत्त्वाचे होते. सलग झालेल्या निराशाजनक पराभवांनंतर विजय मिळाल्याने रिकल्टनही आनंदी होता.

“निकाल योग्य बाजूने लागल्याचा आनंद आहे. या सीझनचा इतिहास पाहता अशा प्रकारचे निकाल आनंद देतात. मला संघासाठी योगदान देत असल्यामुळे आनंद वाटतो. आपण नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करत असतो, पण मी एमआयला प्राधान्य देतो आणि संघाच्या यशात योगदान देतो. त्यामुळे सध्या मी माझ्या खेळावर समाधानी आहे.”

सलामीला एक छान परिपूर्ण भागीदारी झाली. त्यात रोहित आणि रिकल्टन दोघेही एकमेकांच्या प्रत्येक फटक्याला तोडीस तोड उत्तर देत होते. रायनने खेळपट्टीवर फलंदाजी करताना आणि सरावादरम्यान त्या दोघांमध्ये होणाऱ्या काही संभाषणांवर प्रकाश टाकला आहे.

"पहिल्या वर्षी मी त्याच्याकडून केवळ टी-२० मधल्या फलंदाजीबद्दलच नाही, तर कसोटी आणि ५० षटकांच्या फलंदाजीबद्दलही, त्यातील बारकावे आणि त्यामागील मानसिकतेबद्दल अधिक माहिती घेतली. त्याची जडणघडणच वेगळी आहे, तो क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक आहे... तो दबावाला कसा सामोरा जातो, शांत कसा राहतो, आपल्या क्षमतेवर कसा विश्वास ठेवतो आणि आपला खेळ किती चांगल्या प्रकारे समजून घेतो, हे विशेष महत्त्वाचे आहे. भारताच्या महान खेळाडूंपैकी एकासोबत फलंदाजी करणे हा एक खूप छान अनुभव आहे आणि मला आणखी संधी मिळेल अशी आशा वाटते."