News

सिराजची जादू, सामना बरोबरीत, भारताचा टी२०आय मालिकेत विजय

By Mumbai Indians

नेपियरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या क्रिकेटप्रेमींची आज चांगलीच निराशा झाली. न्यूझीलंड आणि भारतादरम्यानचा तिसरा टी२०आय सामना दुसरी इनिंग पावसामुळे मध्येच थांबवण्यात आल्यामुळे बरोबरीत सुटला.

त्या दिवसाच्या सुरूवातीला ग्लेन फिलिप आणि डेवॉन कॉनवे न्यूझीलंडसाठी एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत दिसत होते. पण भारतीय जलदगती गोलंदाजांचा डेथ ओव्हर्समध्ये सामना करणे त्यांच्यासाठी जवळपास अशक्य ठरले. मोहम्मद सिराजने थोडे जोरदार बंपर्स टाकले आणि टी२०आयमधील आपल्या करियरमधील सर्वोत्तम आकडेवारी दिली तर अर्शदीप सिंगनेही चार विकेट्स खिशात टाकल्या.

ग्लेन फिलिप्सची आतषबाजी

प्रभारी कर्णधार टिम साऊथीने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडने पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स पटापट गमावल्या. भारतीय स्पिनर्स युजवेंद्र चहल आणि दीपक हूडा यांनी मधल्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या संघाला बांधून ठेवले.

परंतु फिलिप्स आणि कॉनवे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावा करून किवीजना सामन्यावर पकड पुन्हा मिळवून दिली. फिलिप्सचा फॉर्म उत्तम होता. त्याने स्पिनर्सवर जोरदार हल्ला करून धावसंख्येचा वेग प्रचंड वाढवला. त्याने ३३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या आणि कॉनवेनेही आपले अर्धशतक पूर्ण केले.

मियाँभाईचा जलवा!

न्यूझीलंडने १५ ओव्हर्समध्ये १२९/२ धावसंख्या उभारल्यामुळे ते भारतासमोर धावांचा डोंगर ठेवतील असे वाटत होते. परंतु मोहम्मद सिराजचे अप्रतिम गोलंदाजी करून त्यांचे हे स्वप्न संपुष्टात आणले. अत्यंत वेगाने टाकलेल्या त्याच्या शॉर्ट चेंडूंमुळे किवीजसाठी परिस्थिती वाईट झाली. त्यांनी २८ चेंडूंमध्ये आठ विकेट्स गमावल्या. सोळाव्या ओव्हरमध्ये त्याने भारतासाठी चिंतेचा विषय बनलेल्या फिलिप्सलाही बाद केले. त्यानंतर त्याने १८ व्या ओव्हरमध्ये आणखी दोन विकेट्स घेऊन आपल्या करियरमधील सर्वोत्तम ४/१७ ची कामगिरी केली. अर्शदीपनेही आपल्या या जोडीदाराला उत्तम साथ दिली. त्याने डेथ ओव्हर्समध्ये तीन विकेट्स घेतल्या.

भरीस भर म्हणून सिराजने अगदी लांबून नेम धरून जोरात चेंडू फेकला आणि एडम मिल्नेला बाद केले. त्याची आजची खेळी एखादा जलवा असावा अशीच होती. न्यूझीलंडचा संघ १९.४ ओव्हर्समध्ये १६० धावा करून सर्वबाद झाला.

संकटाची चाहूल!

किवीजनी अत्यंत सुंदर गोलंदाजी करून भारतीय संघाला चांगलेच जखडून ठेवले. त्यांनी पटापट तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय तंबूत काळजीचे वातावरण निर्माण झाले. मिल्नेने ईशान किशनला बाद केल्यानंतर टिम साऊथीने सलग दोन चेंडूंमध्ये ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना पॅव्हिलियनला पाठवले.

तीन ओव्हर्समध्ये भारताची स्थिती २१/३ अशी झाली.

कर्णधार हार्दिकचा प्रतिहल्ला

पटापट विकेट गेल्यामुळे हार्दिक पंड्या मात्र घाबरला नाही. त्याने चौथ्या ओव्हरमध्ये तीन चौकार फटकावले. त्यानंतरच्या दोन ओव्हर्समध्ये त्याने दोन षटकार मारले. सूर्या यावेळीही आपली कमाल दाखवेल असे वाटत असताना तो ईश सोधीच्या गोलंदाजीवर लवकरच बाद झाला.

मग पावसाने आपला खेळ दाखवायला सुरूवात केली आणि तो जोरदार बरसू लागला. तेव्हा भारताची धावसंख्या ९ ओव्हर्समध्ये ७५/४ वर होती. ती डीएलएसच्या मानकानुसार बरोबर होती. पंड्याने १८ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या होत्या आणि दोन्ही टीम्सनी पुन्हा खेळ सुरू होण्यासाठी प्रार्थना केल्या. परंतु पावसाने ऐकले नाही.

या दोन्ही संघांमधील ओडीआय मालिका ऑकलंड येथे २५ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

थोडक्यात धावसंख्या

न्यूझीलंड १९.४ ओव्हर्समध्ये सर्व बाद १६० धावा (डेवॉन कॉनवे ५९, मोहम्मद सिराज ४/१७) भारत ९ ओव्हर्समध्ये ७५/४ (हार्दिक पंड्या ३०*, टिम साऊथी २/२७) सामना बरोबरीत.