News

तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना

By Mumbai Indians

ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी२०आय मालिकेत नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आता आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२२ पूर्वी या स्वरूपातील शेवटच्या स्पर्धेसाठी तयार आहे.

अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मालिकेतील भारतीय संघात विशेष बदल केले गेलेले नाहीत.

जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघात आला आहे. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे.

परंतु, आताच्या अहवालांनुसार जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी आणि अष्टपैलू दीपक हूडा हे अनुक्रमे कोविड-१९ आणि पाठीच्या दुखापतीतून बरे झालेले नाहीत.

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू तंदुरूस्त आहेत आणि या मालिकेसाठी संघात दिग्गज खेळाडूंचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

प्रोटीआजच्या संघाने इंग्लंड आणि आयर्लंडविरूद्ध आधीची टी२०आय मालिका जिंकली आहे आणि या मालिकेतही ते आत्मविश्वासाने खेळतील अशी अपेक्षा आहे.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी२०आय विजयाचा ताळेबंद

यापूर्वी याच वर्षात हे दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत भेटले. ही मालिका २-२ ने सुटली आणि शेवटचा सामना पावसामुळे बाद झाला.

या स्वरूपाची सुरूवात झाल्यापासून एकूणच विजयाच्या टक्केवारीत टीम इंडियाचे पाहुण्या संघावर वर्चस्व राहिले आहे. एकूण खेळण्यात आलेल्या २० टी२०आय खेळांपैकी भारताने ११ वेळा विजय मिळवला तर प्रोटीआजनी ११ वेळा विजयावर शिक्कामोर्तब केले.

परंतु गंमतीचा भाग म्हणजे टीम इंडियाने आपल्या घरच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळवण्यात आलेल्या तीन मालिकांपैकी एकदाही टी२०आय मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील या संघाला भारतावर आघाडी घेण्याची संधी आहे.

भारतीय संघाने २०२२ मध्ये आतापर्यंत २१ टी२०आय सामने जिंकले आहेत. ते कॅलेंडर वर्षात कोणत्याही टीमने जिंकलेल्या सामन्यांपैकी सर्वाधिक आहेत. हे तीन टी२०आय आणि पुढील महिन्यात टी२० वर्ल्ड कप असताना त्यांना रेकॉर्ड वाढवण्याची प्रचंड संधी आहे.

भारताची डेथ बॉलिंग चिंतेचा विषय आहे

टीम इंडियाच्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीबाबत अलीकडील काळात प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. इनिंगच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा थांबवताना संघ चाचपडताना दिसतो.

जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांच्यासाठी थोडा कठीण काळ आहे. परंतु डेथ ओव्हर गोलंदाजीसाठी तयार असलेला अर्शदीप सिंग संघात परतल्यामुळे टीम इंडिया त्याला जसप्रीत बुमरासोबत जोडण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या गोलंदाजीची परीक्षा प्रोटीआजच्या आक्रमक फलंदाजीसमोर ठरेल.

ही जोडी यशस्वी ठरल्यास टीमला पुढील महिन्यातील टी२० वर्ल्डकपपूर्वी थोडा दिलासा मिळेल.

या खेळाडूंमधल्या लढाईवर लक्ष राहील

सूर्यकुमार यादव विरूद्ध कागिसो रबाडा

मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज अलीकडे प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत १८५.४८ च्या स्ट्राइक रेटने तीन सामन्यांत ११५ धावा काढल्या.

त्याच्या या वेगाला दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा खीळ घालू शकतो. त्याने सूर्यकुमारला २०१९ पासून खेळलेल्या आठ आयपीएल सामन्यांत तीन वेळा बाद केले  आहे.

रीझा हेंड्रिक्स विरूद्ध जसप्रीत बुमरा

ओपनर रीझा हेंड्रिक्स हा टी२०आयमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील या फॉर्ममधील पाच सामन्यांमध्ये ७०, ५३, ५७, ४२ आणि ७४ धावा केल्या आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमरावर धावांचा वेग कमी ठेवून रनरेटवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असेल.

भारत मालिकेतील पहिला २०आय सामना केरळमधील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर २८ सप्टेंबर रोजी खेळेल. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी आसाममध्ये सामना खेळवला जाईल. शेवटचा सामना इंदोरमध्ये ४ ऑक्टोबर रोजी होईल. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.०० वाजता सुरू होतील.

चला आपल्या संघाचा उत्साह वाढवूया, पलटन!