News

INDvNZ ओडीआय पूर्वावलोकनः श्रीलंकेला व्हाइटवॉश, आता ब्लॅक कॅप्सची पाळी

By Mumbai Indians

रोहित शर्माकडून सामन्याला लगेचच सूर पकडून देणे, शुभमन गिलची धावांची लुटालूट, मोहम्मद सिराजकडून फलंदाजांचा पिट्टा आणि विराट कोहलीचा धुरळा- नववर्षाची सुरूवात यापेक्षा जास्त चांगली होऊच शकली नसती.

श्रीलंकेला अत्यंत यशस्वीरित्या गुंडाळल्यानंतर आता मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी आमनेसामने होणार आहे आणि त्याची सुरूवात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांनी होईल. मालिकेची सुरूवात हैदराबादमध्ये होणार आहे. हेच ते शहर जिथे सात सामन्यांमध्ये (दोन एकदिवसीय आणि पाच कसोटी) किवीजनी एकही आंतरराष्ट्रीय सामना जिंकलेला नाही.

हे दोन्ही संघांनी एकाच महिन्यापूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ झाल्यानंतर लगेचच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत एकमेकांचा सामना केला होता. या सामन्यात पावसानेही हजेरी लावून तीनपैकी दोन सामने बंद पाडले होते. ब्लॅक कॅप्सने एकच एकदिवसीय सामना टॉम लॅथमच्या शतकामुळे जिंकला. तो आता केन विल्यमसन आणि टिम साऊथीशिवाय भारतीय दौऱ्यावर आला आहे.

यजमान संघाबाबत सांगायचे झाल्यास केएल राहुल आणि अक्झर पटेल कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकणार नाहीत. केएस भारतला ईशान किशन या आपल्या छोट्या डायनॅमोसोबत आणखी एक विकेट कीपिंगसाठी पर्याय म्हणून निवडले गेले आहे. अक्झर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळण्याची शक्यता आहे.

काय: भारत विरूद्ध न्यूझीलंड, तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका.

कधी: १८ जानेवारी, २१ जानेवारी, २४ जानेवारी.

कुठे: हैदराबाद (पहिला ओडीआय), रायपूर (दुसरा ओडीआय) आणि इंदोर (तिसरा ओडीआय)

ते काय म्हणतात:

“आम्ही आता लगेचच ड्रॉइंग बोर्डवर जाऊन (पुढील मालिकेसाठी) पिच कसे आहे हे पाहणार आहोत. त्यानंतर रचना कशी असेल याचा निर्णय घेतला जाईल. न्यूझीलंडने पाकिस्तानविरूद्ध मालिका जिंकली आहे. त्यामुळे हे अजिबात सोपे ठरणार नाही,” – कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर सांगितले.

काय अपेक्षा आहे: भारताने यापूर्वी दोन वेळा श्रीलंकेविरूद्ध फलंदाजी केली आहे आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे जास्त धावसंख्या उभी राहण्याची अपेक्षा करू शकतो कारण किवीज फलंदाजदेखील उत्तम फॉर्ममध्ये आहेत. ही मालिका गोलंदाजांच्या कामगिरीवर मुख्यत्वे अवलंबून असेल (लवकर बरा हो, बूम बूम!) कारण खेळपट्टी सपाट असल्यामुळे चुका करण्यासाठी वाव नसेल.

आपण काय करायचे आहे: तसे पाहायचे तर तुमच्या शहरात कोणतेही सामने असतील तर स्टेडियमवर जा आणि क्रिकेटची मजा घ्या. कारण आता येणाऱ्या विश्वचषकाची तयारी सुरू झाली आहे. तुम्ही तुमच्या टीव्ही किंवा मोबाइलवरही पाहत असला तरी हे विसरू नका की आपले खेळाडू सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सर्वोच्च दर्जाचे मनोरंजन नक्की मिळू शकेल. भारतीय संघाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, पलटन!