लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांच्या योगदानाबद्दल मुंबई इंडियन्सकडून मनःपूर्वक आभार
मुंबई इंडियन्सने आज पुरुष संघाच्या प्रशिक्षकवर्गातील लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे आपापल्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याची घोषणा केली. या तिघांनीही संघाप्रती दाखवलेली निष्ठा, त्यांचं मोलाचं योगदान आणि त्यांनी दिलेल्या सेवांबद्दल मुंबई इंडियन्सने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्स परिवाराचा अविभाज्य भाग राहिला असून, फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. MI च्या गोलंदाजीची धुरा सांभाळत चार आयपीएल विजेतेपदांमध्ये आणि २०११ च्या चॅम्पियन्स लीग टी२० विजेतेपदात मोलाची भूमिका बजावण्यापासून ते मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून पुन्हा संघात परतण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने खास राहिला आहे. क्रिकेटविषयीची त्याची आवड, जिंकण्याची जिद्द आणि संघाप्रती असलेली निष्ठा यामुळे अनेक पिढ्यांतील खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. त्याचा वारसा मुंबई इंडियन्सच्या इतिहासाचा कायमच एक महत्त्वाचा भाग राहील.
पारस म्हांब्रे यांचं मुंबई इंडियन्ससोबतचं नातंही दीर्घकाळ टिकलेलं आणि अत्यंत मोलाचं राहिलं आहे. त्यांनी सर्वप्रथम २०१० ते २०१७ या काळात संघासोबत काम केलं आणि त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं. या दोन्ही कार्यकाळांत त्यांनी आपला प्रदीर्घ अनुभव, समर्पण आणि MI च्या संस्कृतीची सखोल जाण संघासाठी उपयोगात आणली. संघातील गोलंदाजांची प्रतिभा ओळखून त्यांना घडवण्यात आणि त्यांच्या कौशल्याला वाव देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जपलेली नातीही संघासाठी तितकीच मोलाची ठरली आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल मुंबई इंडियन्स त्यांची मनापासून आभारी आहे.
कार्ल हॉपकिन्सन २०२५ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाले होते. इंग्लंडच्या पुरुष संघासोबत काम करताना मिळालेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोलाचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत आणला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता, क्षेत्ररक्षणातील तज्ज्ञता आणि संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
मुंबई इंडियन्स संघासाठी आणि संपूर्ण MI परिवारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लसिथ, पारस आणि कार्ल या तिघांचेही मनःपूर्वक आभार मानते.
या तिघांनी दाखवलेली निष्ठा, त्यांनी जपलेली नाती आणि त्यांच्या साथीने निर्माण झालेल्या अविस्मरणीय आठवणी आमच्या प्रवासाचा कायमच एक भाग राहतील.
या तिघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
एकदा MI, कायम MI!