News

कोहलीच्या आतषबाजीमुळे भारतीयांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित

By Mumbai Indians

विराट कोहलीने आज आपल्या विराटरूपात येऊन ५३ चेंडूंमध्ये ८२ धावा फटकावल्या. रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावरील टी२० वर्ल्ड कप २०२२च्या अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात भारताला पाकिस्तानविरूद्ध ४ विकेट्सनी विजय प्राप्त करता आला.

हार्दिक पंड्या आणि कोहली यांनी ११३ धावांची भागीदारी करून भारताच्या १६० धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यात मोलाची भर घातली आणि वर्ल्डकपचा पहिलाच सामना खिशात घातला. पंड्याने पहिल्या सत्रात तीन विकेट्स तर घेतल्याच पण त्याने ३७ चेंडूंमध्ये ४० धावा काढून फलंदाजीतही आपला ठसा उमटवला.

टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सात सामन्यांपैकी भारताने हा सहावा सामना जिंकला आहे.

प्रचंड गर्दी असलेल्या एमसीजीवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानी डावखुऱ्या फलंदाजांचा समाचार घेण्यासाठी युजवेंद्र चहलपूर्वी रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजी केली. मैदानात उतरलेल्या ११ च्या संघामधून हर्षद पटेल या जलदगती गोलंदाजाला या वेळी विश्रांती देण्यात आली. त्याऐवजी मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग खेळायला उतरले.

भुवनेश्वर आणि अर्शदीप यांनी अगदी थोड्याशा ओव्हरकास्ट स्थितीचा फायदा उचलला. त्यांनी नवीन चेंडूचाही खूप चांगल्या प्रकारे वापर केला. अर्शदीपने आपल्या पहिल्या वहिल्या चेंडूतच कर्णधार बाबर आझमला शून्यावर बाद केले आणि आपले वर्ल्ड कप स्पर्धेतील विकेट्सचे खाते उघडले.

या डावखुऱ्या गोलंदाजाने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली. मोहम्मद रिझवानला त्याच्या छोट्या चेंडूने डीप फाइन लेगवर बाद केले. पाकिस्तानला पॉवर प्लेमध्ये फक्त ३२ धावा करता आल्या. शान मसूद आणि इफ्तिकार अहमद यांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

या दोघांनी पुढच्या पाच ओव्हर्समध्ये फक्त ३४ धावा जोडल्या आणि नंतर भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. इफ्तिकारने ११ व्या ओव्हरमध्ये सामन्यातला पहिला षटकार ठोकला आणि त्यानंतर अक्झर पटेलच्या पुढच्याच ओव्हरमध्ये तीन षटकार खेचले. त्यामुळे इनिंगमध्ये प्रथमच पाकिस्तानचा रन रेट ७.५ वर गेला.

परंतु मोहम्मद शामीने भारतीय संघाला सावरले. त्याने इफ्तिकारची विकेट एक फुल डिलिव्हरी टाकून घेतली. त्याच्या या गोलंदाजीपुढे इफ्तिकार बचाव करू शकला नाही.

या विकेटमुळे पाकिस्तानची चांगली बसलेली घडी विस्कळीत झाली. त्यानंतर पुढच्या तीन ओव्हर्समध्ये फक्त १५ धावा करून त्यांनी तीन विकेट्स घालवल्या. हैदर अली, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी हार्दिक पंड्याचे चेंडू मैदानाबाहेर टोलवायचा प्रयत्न केला. परंतु ते क्षेत्ररक्षकांच्या हातात विसावले.

डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप सिंग गोलंदाजीसाठी परतला आणि त्याने आसिफ अलीला बाद केले. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने १४ धावा दिल्या. त्याच ओव्हरमध्ये शान मसूदनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. तरीही अर्शदीपचा खेळ वाखाणण्याजोगा होता. त्याने ३/३२ अशी कामगिरी केली.

भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोनेक ओव्हरथ्रो झाले. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. पाकिस्तानने आपल्या २० ओव्हरमध्ये १५९/८ अशी धावसंख्या उभारली.

हार्दिक पंड्याची गोलंदाजी या वेळी अप्रतिम ठरली. त्याने चार ओव्हर्समध्ये ३० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

दुसऱ्या सत्रात १५९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची पहिल्याच टप्प्यात पडझड झाली. पॉवरप्लेमध्ये भारताने एकामागून एक तीन विकेट्स घालवल्या.

नसीम शाह या १९ वर्षीय जलदगती गोलंदाजाच्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात केएल राहुल बाद झाला. हॅरिस रॉफने दोन ओव्हर्समध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा हॅरिस रॉफच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर या वर्षात भारताचा आघाडीचा टी२०आयमधील फलंदाज सूर्यकुमार यादवही आपल्या इनिंगची उत्तम सुरूवात करून बाद झाला आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना या पहिल्या काही ओव्हर्समध्ये फक्त ३१ धावा करता आल्या.

हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांच्या आधी अक्झर पटेल पाचव्या क्रमांकावर खेळायला आला. परंतु संघाने पत्करलेल्या या धोक्याचा विशेष फायदा झाला नाही. एक चोरटी धाव काढण्याचा अक्झर आणि कोहलीचा प्रयत्न अक्झरसाठी घातक ठरला. तो धावबाद झाला.

त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी भारताचा खेळ सावरला. त्यांनी मधल्या टप्प्यापर्यंत सामना हातातून निसटतो की काय असे वाटत असताना चांगली भागीदारी केली. इनिंगच्या सुरूवातीला आवश्यक असलेला रन रेट ८ वरून ११.५ वर गेला होता. परंतु या दोघांनी संयमी खेळ करत स्पिनर्सवर जोरदार प्रतिहल्ला सुरू केला.

शादाब खानच्या ११ व्या ओव्हरमध्ये नऊ धावा केल्यानंतर या फलंदाजांनी बाराव्या ओव्हरमध्ये मोहम्मद नवाजच्या फलंदाजीवर तीन षटकार ठोकले. त्यातले दोन षटकार पंड्याच्या बॅटमधून आले होते. त्यांनी पुढच्या तीन ओव्हर्समध्ये प्रत्येकी एकेकदा चेंडू सीमापार टोलवत रन रेट आपल्या आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.

नसीम शाह आणि हॅरिस रॉफ यांनी १६ व्या आणि १७ व्या ओव्हरमध्ये फक्त १२ धावा दिल्या. नंतर कोहलीने एकामागून एक फटक्यांची आतषबाजी करून अक्षरशः दिवाळी साजरी केली. त्याने आफ्रिदीच्या १८ व्या ओव्हरमध्ये तीन चौकार मारले, पेनल्टीटाइम ओव्हरमध्ये दोन मोठे षटकार टोलवले. त्यामुळे शेवटच्या सहा चेंडूंमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज राहिली.

हार्दिक पंड्या विराट कोहलीच्या साथीने १०० धावांची भागीदारी केल्यावर नवाझकडून बाद झाला. परंतु कोहलीने नो बॉलवर षटकार ठोकून दिला. दिनेश कार्तिक बाद झाल्यामुळे थोडी गडबड झाली. परंतु रवीचंद्रन अश्विने शेवटच्या चेंडूवर विजयी धावा काढल्या.

भारत आता २७ ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँड्सविरूद्ध खेळेल.

थोडक्यात धावसंख्या: पाकिस्तानचा २० ओव्हर्समध्ये १५९/७ धावा करून (शान मसूद ५२*, हार्दिक पंड्या ३/३०) भारताकडून २० ओव्हर्समध्ये १६०/६ धावांमुळे पराभव (विराट कोहली ८२*, हॅरिस रॉफ २/३६)

भारत आता २७ ऑक्टोबर रोजी आयसीसी टी२० वर्ल्ड २०२२ च्या दुसऱ्या सुपर १२ सामन्यात नेदरलँड्सचा सामना करेल.