News

टी२०आयच्या पहिल्या सामन्यात भारताकडून विंडीजचा ६८ धावांनी पराभव

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाने आपल्या टी२०आय मालिकेतील शुक्रवारी ब्रायन लारा क्रिकेट एकेडमी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे आयोजित पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाचा ६८ धावांनी पराभव केला. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

रोहित शर्माने ४४ चेंडूंमध्ये पाडलेला ६४ धावांचा पाऊस आणि दिनेश कार्तिकच्या १९ चेंडूंमधील ४१ धावांमुळे भारताला दिलेल्या २० ओव्हर्समध्ये १९०/६ पर्यंत पोहोचता आले.

वेस्ट इंडिजच्या संघाबाबत सांगायचे झाल्यास जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफ यांने ४६ धावांसाठी दोन विकेट्स घेतल्या तर डावखुरा स्पिनर अकील हुसैनने चार ओव्हर्समध्ये फक्त १४ धावा देऊन एक विकेट घेतली.

भारताने विंडीजला आश्चर्याचा धक्का देत धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादवला कर्णधार रोहित शर्मासोबत इनिंग सुरू करण्यासाठी प्रमोशन दिले.

रोहित आणि सूर्यकुमार यांनी पाहुण्या संघाला एक जोरदार सुरूवात करून दिली. त्यांनी ४.३ ओव्हर्समध्ये ४४ धावा केल्या. सूर्यकुमार १६ चेंडूंवर २४ धावा करून बाद झाला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला श्रेयस विंडीजचा डावखुरा जलदगती गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.

विकेट कीपर ऋषभ पंत रोहितसोबत क्रीझवर खेळायला आला. या दोघांनी भारताचा खेळ सावरून धरला आणि त्याला वेग दिला.

परंतु पाहुण्या संघाने पंत (१४) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (१) याची विकेट एकामागून एक गावली आणि स्कोअर ११.५ ओव्हर्समध्ये १०२ / ४ वर ठेवला.

दरम्यान रोहितने दुसऱ्या बाजूने आपला दमदार खेळ सुरू ठेवला आणि आपले टी२०आय मधील २७ वे अर्धशतक पूर्ण केले.

हा भारतीय कर्णधाराचा टी२०आय स्वरूपातील ३१ वा ५० पेक्षा अधिक स्कोअर होता. त्याने विराट कोहलीचा टी२०आयमधील ३० वेळा ५० पेक्षा अधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला.

त्याचबरोबर रोहितने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा घेणारा खेळाडू म्हणून आपले स्थान बळकट केले. या ३५ वर्षीय खेळाडूने १२९ सामन्यांमध्ये ३४४३ धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्तिलच्या ११६ टी२०आयमधील ३३९९ धावांचा विक्रम मागे टाकला आहे.

त्यानंतर जलदगती गोलंदाज जेसन होल्डरने रोहितला ६४ धावांवर बाद करून विंडीज संघाला पुन्हा खेळात आणले.

रोहित बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक भारतीय इनिंगला पुनरूज्जीवन देण्यासाठी ऑल राऊंडर रवींद्र जडेजासोबत मैदानात उतरला.

जडेजा १६ धावांवर बाद झाला. परंतु कार्तिकने आपला जोरदार खेळ सुरूच ठेवला. त्याने १९ चेंडूंवर ४१ धावा फटकावून भारताची धावसंख्या १९०/६ वर न्यायला मदत केली.

वेस्ट इंडिजच्या संघाने १९१ धावांचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. आयोजक संघ आपल्या २० ओव्हर्समध्ये १२२/८ वर पोहोचू शकला.

स्पिनर्स रवीचंद्रन अश्विन, रवी बिष्णोई आणि डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हे भारतासाठी उत्तम गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज शमरा ब्रुक्सने १५ चेंडूंमध्ये २० धावा केल्या तर शेवटचा खेळाडू कीमो पॉल १९ धावांवर नाबाद राहिला.

दिनेश कार्तिकला त्याच्या अप्रतिम खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कमध्ये दुसऱ्या टी२०आय सामन्यासाठी आमनेसामने येतील. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरू होईल.