
SRH vs MI: विजयाची हॅटट्रिक, मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय
आयपीएल २०२३ च्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये स्थानिक टीमला १४ धावांनी हरवून रोहित ब्रिगेडने सीझनचा सलग तिसरा विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सविरूद्ध टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करमने टीममध्ये काहीही बदल केला नाही तर मुंबईच्या टीमने डुआन जॉन्सनऐवजी जेसन बेहरेनडॉर्फला खेळवले.
सलामी जोडीने केली वेगवान सुरूवात
आधी फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमला कर्णधार रोहित शर्मा आणि आपला पॉकेट डायनॅमो ईशान किशन यांच्या सलामी जोडीने वेगवान आणि जोरदार सुरूवात करून दिली. मुंबईची पहिली विकेट ४१ धावांवर पडली. टी. नटराजनने या वेळी मार्करमच्या हातात कॅच देऊन हिटमॅनला बाद केले आणि आपल्या टीमला पहिला विजय मिळवून दिला. रोहितने ६ चौकार फटकावून १८ चेंडूंवर २८ धावा केल्या.
६ हजारी क्लबमध्ये रोहितचा समावेश
याच दरम्यान तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर हिटमॅनने वॉशिंग्टनच्या चेंडूवर एक सुंदर चौकार फटकावून आयपीएल करियरमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला. तो आयपीएलच्या ६ हजारच्या क्लबमध्ये आलाय. ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आणि जगातला चौथा फलंदाज ठरलाय.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या कॅमेरॉन ग्रीनने अत्यंत सावध फलंदाजी करत ईशानसोबत खेळ पुढे नेला. परंतु ईशान १२ व्या ओव्हरमध्ये ३८ धावा करून मार्को जॅन्सनच्या चेंडूवर बाद झाला. याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जॅन्सनने सूर्यकुमार यादवलाही बाद केले आणि मुंबईला तिसरा झटका दिला. सूर्याने ७ धावा केल्या.
ग्रीनचे अर्धशतक
यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी खेळ सावरला आणि धावफलक पळू लागला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २६ चेंडूंमध्ये ५० धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारने तिलक वर्माला बाद करून ही भागीदारी तोडली. वर्माने १७ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि २ चौकार मारून ३७ धावा केल्या.
त्यानंतर टिम डेव्हिड खेळपट्टीवर उतरला आणि त्याने ग्रीनला चांगलीच साथ दिली. कॅमेरॉनने ३३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या संपूर्ण खेळात त्याने ४० चेंडूंवर २ षटकार आणि ६ चौकार मारून ६४ धावा केल्या. मुंबई इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर तिलक वर्मा रन आऊट झाला.
अशा प्रकारे मुंबईच्या टीमने ठरलेल्या २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन १९२ धावा केल्या आणि हैदराबादसमोर १९३ धावांचे दणदणीत लक्ष्य ठेवले.
हैदराबादकडून मार्को जॅन्सनने २ विकेट्स घेतल्या आणि भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांनी आपल्या एकेका खेळाडूला बाद केले.
हैदराबादच्या इनिंगचे तीनतेरा
विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांची सुरूवातच डळमळीत झाली. मागच्या सामन्यात शतक करणाऱ्या हॅरी ब्रुकला बेहरेनडॉर्फने फक्त ९ धावांवर बाद केले. हैदराबादला दुसरा फटकादेखील जेसन बेहरेनडॉर्फनेच दिला. त्याने राहुल त्रिपाठीला ईशान किशनच्या हातून कॅच पकडून पॅव्हिलियनचा मार्ग दाखवला.
खूप कमी अंतराने दोन विकेट दिल्यानंतर हैदराबादच्या धावांचा वेग मंदावला. परंतु एडेन मार्करम आणि मयंक अग्रवाल यांनी आपल्या टीमला सावरून ठेवले. मुंबईने ९व्या आणि १० व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन सामन्यावरची आपली पकड मजबूत केली.
नवव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनने हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करमला बाद केले. मार्करमने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अभिषेक शर्मालाही पियूष चावलाने १० व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले.
हेन्रिक क्लासेन मुंबईसाठी खूपच धोकादायक ठरू लागला होता. परंतु पियूषने सामन्यात त्याला आपली दुसरी शिकार बनवत मुंबईच्या विजयाचा मार्ग आणखी प्रशस्त केला. क्लासेनने १६ चेंडूंमध्ये ३६ धावा करून आपल्या टीमसाठी विजयाच्या आशा निर्माण केल्या. हेन्रिक क्लासेन बाद झाल्यानंतर मयंक अग्रवालदेखील ४८ धावांवर रायली मेरेडिथकडून बाद झाला. रायली मेरेडिथने माक्रो जॅन्सनला बाद करून सामन्यातली आपली दुसरी विकेट मिळवली. १८ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर टिम डेव्हिडने वॉशिंग्टन सुंदरला रनआऊट करून आठवी विकेट घेतली.
शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी २० ओव्हर्स हव्या होत्या तर मुंबईला आपल्या तिसऱ्या विजयासाठी २ विकेट्स हव्या होत्या. रोहितने तरूण गोलंदाज अर्जुन तेंडुलकरच्या हातात चेंडू दिला आणि शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सोपवली. अत्यंत सावध गोलंदाजी करत त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ केला. या ओव्हरमध्ये तेंडुलकरच्या दुसऱ्याच चेंडूवर अब्दुल समद रनआऊट झाला.
अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधली आपली पहिली विकेट भुवनेश्वर कुमारची घेतली. त्याने रोहित शर्माकडे त्याला कॅच द्यायला भाग पाडले.
अशा प्रकारे हैदराबादची पूर्ण टीम १९.५ ओव्हर्समध्ये १७८ धावा करून बाद झाली आणि मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळवला. या सीझनमध्ये एमआयचा हा सलग तिसरा विजय आहे.
मुंबईकडून जेसन जेसन बेहरेनडॉर्फ, रायली मेरेडिथ आणि पियूष चावला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स आता पुढचा सामना पंजाब किंग्सविरूद्ध शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये खेळणार आहे.