News

RR vs MI प्रीव्ह्यू: चौथ्या विजयाच्या इराद्याने हार्दिक ब्रिगेड मैदानात उतरणार

By Mumbai Indians

आयपीएल २०२४ चा रोमांच सुरूच आहे. हार्दिक अँड कंपनी आपल्या फॉर्ममध्ये परतली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ च्या ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सामोरा जायला सज्ज आहे. आपल्या टीमची नजर आता या सीझनमधला चौथा विजय नोंदवण्यावर असेल. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाईल.

एमआय टीमने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. आपल्या टीमने त्यात तीन सामन्यांमध्ये विजय नोंदवला असून चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरआर टीमबद्दल बोलायचे झाल्यास हा संघ सध्या या सीझनमध्ये फॉर्ममध्ये आहे. त्यांनी सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत विजय नोंदवला आहे तर फक्त एकाच सामन्यात पराभव पत्करला आहे.

या सीझनमध्ये आपल्या हिटमॅननने एमआयसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६४.०८ च्या स्ट्राइक रेटने २९७ धावा केल्या असून १८ षटकार आणि ३० चौकार फटकावले आहेत.

याशिवाय रोहित शर्माच्या चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध केलेल्या १०५* धावांच्या धमाकेदार कामगिरीला कोणीही विसरू शकत नाही. त्याशिवाय तिलक वर्माने १५४.०७ च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत २०८ धावा केल्या आहेत. त्याने या सीझनमध्ये सर्वाधिक ६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे एमआयच्या चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा या खेळाडूंच्या फटकेबाजीवर असतील.

एमआयच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्याने ७ सामन्यांमध्ये ५.९६ या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय गेराल्ड कोत्झीने ७ सामन्यांमध्ये १२ विकेट्स पटकावल्या आहेत.

RR vs MI हेड-टू-हेड आकडेवारी

क्रिकेटच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स टीम २८ वेळा एकमेकांविरूद्ध खेळल्या आहेत. आपल्या टीमचे पारडे यात जड आहे. एमआयने १५ सामने जिंकले असून आरआरने फक्त १३ सामने जिंकले आहेत.

काय: आयपीएल २०२४ चा ३८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: सोमवार, २२ एप्रिल २०२४. सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर

काय अपेक्षा आहे: मुंबई इंडियन्सच्या टीमला आपला चौथा विजय नोंदवताना पाहायला तयार व्हा. सवाई मानसिंह मैदान ईशान, हिटमॅन रोहित आणि आपला सूर्या दादा यांच्या फटकेबाजीची वाट पाहते आहे.

आपण काय करायचे आहे: पलटन ब्लू अँड गोल्ड जर्सीवर पूर्ण उत्साह आणि प्रेमाने आपला विश्वास कायम ठेवा. प्रत्येक चेंडूवर टीमला चियर करत राहा कारण आपल्याला चौथा विजय नोंदवायचा आहे.