नायकी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अनेक वर्षांच्या किट भागीदारीची घोषणा
जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स आणि नायकी यांनी आज अनेक वर्षांच्या भागीदारीची घोषणा केली. या करारानुसार २०२७ च्या हंगामापासून नायकी भारतातील मुंबई इंडियन्सच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांची अधिकृत किट पार्टनर असणार आहे.
या भागीदारीच्या निमित्ताने मुंबईची महत्त्वाकांक्षा, धाडसी वृत्ती आणि कधीही न थांबणारी ऊर्जा यांची जागतिक क्रीडाक्षेत्रातील आघाडीच्या ब्रँडशी सांगड घातली जाणार आहे. मुंबई इंडियन्स, संघातील खेळाडू आणि संघावर मनापासून प्रेम करणाऱ्या पलटनसाठी हा एका नव्या आणि दमदार पर्वाचा प्रारंभ ठरणार आहे.
या घोषणेमुळे क्रिकेटमधील नायकीच्या वाढत्या गुंतवणुकीला आणखी बळ मिळालं आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील खेळाडू, चाहते आणि क्रिकेटच्या भविष्यासाठी दीर्घकालीन योगदान देण्याची ब्रँडची बांधिलकीही यातून अधोरेखित होते.
या भागीदारीअंतर्गत नायकी मुंबई इंडियन्सच्या दोन्ही संघांसाठी सामन्यांतील पोशाख, सरावाचे कपडे आणि स्पोर्ट्सवेअर उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये प्रशिक्षक आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाचाही समावेश असेल. नायकीच्या नावीन्यपूर्ण क्रीडापोशाखांचा लाभ खेळाडूंसोबतच मुंबई इंडियन्सच्या निळ्या आणि सोनेरी रंगांचा अभिमानाने स्वीकार करणाऱ्या लाखो चाहत्यांनाही मिळणार आहे.
नायकी इंडियाचे जनरल मॅनेजर तरुणदीप सिंग म्हणाले, “क्रिकेट हा भारताच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि या खेळाचा उत्साह मुंबई इंडियन्सइतक्या प्रभावीपणे फार कमी संघांमधून दिसून येतो. या संघाची महत्त्वाकांक्षा आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास यामुळेच खेळाचं सामर्थ्य अधोरेखित होतं. याच गोष्टींमुळे आम्ही या भागीदारीकडे आकर्षित झालो. खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणं, क्रिकेटचा गौरव करणं आणि पुढील पिढीला प्रेरणा देणं, हा या भागीदारीमागचा आमचा उद्देश आहे.”
महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडू शोधणं, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्न करणं, या मूल्यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आपला समृद्ध वारसा निर्माण केला आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या आणि संघाशी घट्ट नातं जपणाऱ्या चाहतावर्गांपैकी एक चाहतावर्गही मुंबई इंडियन्सने उभा केला आहे. खेळाच्या माध्यमातून माणसातील सुप्त क्षमता विकसित होऊ शकतात आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळू शकते, या विचारावर नायकी आणि मुंबई इंडियन्सचा समान विश्वास आहे. मग ते सर्वोच्च स्तरावर खेळणारे खेळाडू असोत किंवा पहिल्यांदाच हातात बॅट घेणारी मुलं असोत.
मैदानाबाहेरही नायकी आणि मुंबई इंडियन्स एकत्र येऊन मुंबईच्या खास ओळखीपासून प्रेरित उत्पादने आणि कथांच्या माध्यमातून खेळ आणि संस्कृती यांना जोडणार आहेत. स्टेडियमपासून शहरातील रस्त्यांपर्यंत या भागीदारीतून मुंबईच्या वेगळेपणाचा उत्सव साजरा केला जाईल. त्याचबरोबर चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाशी आणि क्रिकेटशी असलेलं नातं व्यक्त करण्याच्या नव्या संधीही मिळतील.
रिलायन्स स्पोर्ट्सचे प्रमुख देवांग भीमज्यानी म्हणाले, “मुंबई इंडियन्ससाठी क्रिकेट हा नेहमीच केवळ एक खेळ राहिलेला नाही. आमचे खेळाडू आणि आमची पलटन मिळून आम्ही एक कुटुंब आहोत. प्रतिभेला वाव देणं, खेळाडूंच्या क्षमतेवर निःसंकोच विश्वास ठेवणं आणि कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरासाठी खेळणं, या मूल्यांवर आमचा परिवार उभा आहे. खेळाडूंवरील विश्वास आणि प्रेरणा देण्याच्या खेळाच्या सामर्थ्याबाबत नायकीची विचारसरणीही आमच्यासारखीच आहे. या भागीदारीच्या माध्यमातून क्रिकेट आणि संस्कृती यांना एकत्र आणण्याची, नव्या पिढीला प्रेरणा देण्याची आणि MI व मुंबईची भावना जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी आम्हाला दिसत आहे.”
याच महिन्यापासून मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि कर्मचारी नायकीचे संघासाठी तयार केलेले पोशाख वापरण्यास सुरुवात करतील. महिला आणि पुरुष संघांच्या २०२७ च्या संबंधित हंगामांपूर्वी नायकीने तयार केलेल्या नव्या किट्सचं अनावरण करण्यात येईल. लवकरच चाहत्यांनाही दोन्ही संघांच्या अधिकृत किट्ससोबतच मुंबईची ओळख, ऊर्जा आणि संस्कृतीपासून प्रेरित नायकीच्या इतर क्रीडापोशाखांचा अनुभव घेता येणार आहे.
नायकीचा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाचा सदस्य तिलक वर्मा म्हणाला, “मुंबई इंडियन्सने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली. नायकीदेखील माझ्या प्रवासाचा एक भाग राहिली आहे. त्यामुळे माझ्यासाठी खास असलेले हे दोन परिवार एकत्र येत आहेत, ही गोष्ट माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. नायकीच्या स्वूश चिन्हासह MI च्या रंगांची जर्सी घालताना मला आजवर केलेल्या प्रवासाची आणि अजून किती काही साध्य करायचं आहे, याची आठवण होईल. कुठेतरी एखादा लहान मुलगा नेट्समध्ये सराव करत असेल आणि एक दिवस निळ्या-सोनेरी रंगांची जर्सी घालून खेळण्याचं स्वप्न पाहत असेल. त्याने आमच्याकडे पाहून ‘एक दिवस मीसुद्धा तिथे असू शकतो,’ असा विचार करावा, हीच माझी इच्छा आहे.”