“रोहित आणि रायनचा खेळ ही मेजवानी होती”: महेला जयवर्धने
मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल २०२६ मधील सामन्यात घरच्या खेळपट्टीवर पहिलाच सामना जिंकल्याने १४ वर्षांचे दुष्टचक्र भेदले गेले आहे. एमआयने आपल्या मोहिमेची सुरूवात ६ विकेट्सनी विजयाने केली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य प्रशिक्षम महेला जयवर्धने अत्यंत शांत, संयमी होते आणि त्यांना या क्षणाचे महत्त्व पुरेपूर माहीत होते. 💙
महेला यांनी सर्वप्रथम हे दुष्टचक्र भेदण्याबद्दल सांगितले की, “ही फार चांगली गोष्ट आहे. विकेट चांगली होती. केकेआरने २२० धावा केल्या होत्या. आम्ही २० धावा जास्त दिल्या असे मला वाटते. रोहित आणि रायनने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहणे अद्भुत होते. अत्यंत सुंदर खेळ, आमचा गेमप्लॅन मस्त होता आणि या दोघांनीही तो उत्तमरित्या पार पाडला.”
जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने तीन विकेट्स घेऊन एमआयला सामन्यात परत आणले. त्याच्याबद्दल बोलताना महेला म्हणाले की, “हीदेखील आमची योजना होती कारण आम्हाला अगदी सुरूवातीलाच खूप नवीन गोलंदाज उतरवायचे नव्हते. आम्हाला मधल्या फळीत आणि शेवटच्या टप्प्यात काही पर्याय हवे होते. आम्ही एलएसजीकडून शार्दुलला आणले तेव्हा हाच विचार मनात होता. विविध प्रतिस्पर्धी संघांसोबत गोलंदाजी कॉम्बिनेशन्सबाबत विचार करताना आम्ही असाच विचार करतो.”
रोहित शर्माची ७८(३८) फलंदाजी आणि रिकल्टनच्या ८१(४३) धावा व त्या दोघांमधील भागीदारीबाबत बोलताना ते म्हणाले की, “रोहित आमच्यासोबत शिबिराच्या पहिल्या दिवसापासून होता. तो ताजातवाना होता आणि एकाग्रतेने खेळला. त्याने काही सामने, सराव सामने खेळून सामन्यांशी स्वतःला जुळवून घेतले. तो ज्या प्रकारे चेंडू टोलवत होता त्याने मी खूप खूश झालो. त्याने उत्तम फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी रोहित-रायनने ज्या प्रकारे हाताळली ते पाहणे म्हणजे एक मेजवानीच होती. त्यांनी चांगली भागीदारी केली. हीच गोष्ट आता दीर्घकाळ टिकावी अशी इच्छा आहे.”
“तुम्ही मागच्या सीझनकडे पाहिल्यास रोहित-रिकल्टन यांनी पहिल्या फळीत आमच्यासाठी उत्तम खेळ केला. ते दोघे एकमेकांना पूरक खेळत होते.”
पहिल्या सामन्यात दोन गुण आणि एका विजयाची नोंद खूप वेगळी भावना आहे. मस्त वाटतंय🔥