News

MI v PBKS: रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या यशाच्या घोडदौडीला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध टाटा आयपीएलच्या 31 व्या सामन्यात खीळ बसली. या सामन्यात एमआयचा 13 धावांनी पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून PBKS ला आधी फलंदाजीचे निमंत्रण दिले. PBKS ने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट देऊन 214 धावांचा दणदणीत स्कोर उभा केला. पण एमआयला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट देऊन 201 धावाच करता आल्या.

आपल्या संघाची पाठलागाची सुरूवात डळमळीतच झाली. MI चा सलामी फलंदाज ईशान किशन फक्त 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूंमध्ये 76 धावांची भागीदारी करून डाव सावरला.

रोहित 44 धावांवर बाद झाल्यावर ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगला खेळ करून धावसंख्या 150 च्या पुढे नेली.

या दोन्ही खेळाडूंनी साधलेली लय बघता MI चा संघ सहजपणे सामना जिंकेल असे वाटत होते. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आधी ग्रीन (67) बाद झाला आणि पाठोपाठ सूर्यकुमारदेखील (57) परतला. दोघांनीही अर्धशतक फाटकावले पण त्यांचा हा खेळ पुरेसा ठरला नाही. टिम डेव्हिडने 25 धावा केल्या. पण त्यालाही संघाला विजय मिळवून देता आला नाही. शेवटी 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

पंजाब किंग्सचा खेळ

पंजाबकडून हर्षदीप सिंगने सर्वाधिक म्हणजे 4 विकेट घेतल्या तर नॅथन एलिस आणि लियम लिविंगस्टनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आधी फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्सचीही सुरूवात फार चांगली नव्हती. आपल्या मस्त मौला कॅमेरॉन ग्रीनने PBKS च्या सलामी फलंदाज मॅथू शॉर्टला फक्त 11 धावांवर बाद केले. यानंतर पंजाबचा तरुण खेळाडू अथर्व तायडे याने प्रभसिम्रनसोबत खेळ सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूंमध्ये 47 धावांची भागीदारी केली. आपला तरुण स्टार आणि डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन (26) ला बाद करून ही भागीदारी तोडली.

आपला अनुभवी स्पिन गोलंदाज पीयूष चावला याने पंजाबचा धोकादायक ठरणारा फलंदाज लियम लिविंगस्टनला बाद करून प्रतिस्पर्धी टीमला आणखी एक झटका दिला. त्यानंतर पीयूष चावलाने अथर्वला बाद केले.

यानंतर पंजाबच्या हरप्रीत सिंग आणि सॅम करण यांनी पाचव्या विकेटसाठी 50 चेंडूंमध्ये 92 धावांची भागीदारी करून आपल्या संघाची धावसंख्या 200 पार केली. मुंबई इंडियन्ससाठी कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर अर्जुन, जेसन बेहेरेंडॉर्फ आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.